
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचा इशारा ; बॅनरवर झळकणाऱ्यांना द्यावा लागेल दागिन्यांचा हिशोब

सोलापूर ( प्रतिनिधी ) सोलापूर शहरातील चौकाचौकात डिजिटल बॅनर लावून मोठमोठ्या सोन्याच्या चेनचे प्रदर्शन करणाऱ्यांची आता खैर नाही! बॅनरवर भलीमोठी सोन्याची चेन घालून झळकणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या दागिन्यांबाबत चौकशी केली जाईल, असा थेट आणि स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिला.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील चौक, रस्ते आणि प्रमुख ठिकाणी डिजिटल बॅनरचा अक्षरशः सुळसुळाट झाला होता. एका मंडळाने बॅनर लावला की दुसऱ्याने त्यापेक्षा मोठा बॅनर लावायचा, अशी जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. या बॅनरमुळे मिरवणुकीला तसेच नागरिकांना अडथळा निर्माण होत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
बॅनरबाजीची ही स्पर्धा आता एवढी वाढली आहे की, १५-१६ वर्षांची मुलेही बॅनर लावण्याच्या विचारात आहेत, याबाबत आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या या बॅनरबाजीला वेळीच लगाम घालण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘काम करा, बॅनर लावून प्रसिद्धी नको!’
एखाद्या मंडळाने चांगले सामाजिक काम केले असेल तर त्या परिसरातील नागरिकांना त्याची माहिती असते. त्यामुळे कामापेक्षा मोठा बॅनर आणि प्रसिद्धीची हाव कशासाठी?, असा सवाल उपस्थित करत आयुक्तांनी मोठमोठे फलक लावण्याची गरज नसल्याचे सांगितले.
‘आपले स्वागत आहे’, ‘उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा’ अशा संदेशांचे फलक लावले जातात; मात्र उत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांचे त्या बॅनरकडे लक्षही नसते. शुभेच्छा द्यायच्या असतील तर प्रत्यक्ष भेटून द्या, असा टोला आयुक्तांनी लगावला.
विनापरवाना बॅनर काढणार
विनापरवाना डिजिटल बॅनर आणि फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेच्या मदतीने असे फलक हटविण्यात येणार असून, सार्वजनिक रस्ते आणि चौक बॅनरमुक्त करण्याच्या दिशेने पोलिस प्रशासनाची भूमिका कठोर राहणार आहे.
सोन्याच्या चेनचे प्रदर्शनही पोलिसांच्या रडारवर
सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल बॅनरवर गळ्यात मोठमोठ्या सोन्याच्या चेन घालून फोटो झळकविणाऱ्यांवरही पोलिसांची नजर राहणार आहे. एवढे सोन्याचे दागिने कुठून आले, याबाबत संबंधितांना बोलावून चौकशी केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्त एम. राजकुमार यांनी दिला.
त्यामुळे उत्सवाच्या नावाखाली बॅनरबाजी, शक्तिप्रदर्शन आणि सोन्याच्या दागिन्यांचे उघड प्रदर्शन करणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिस आयुक्तांच्या या भूमिकेमुळे शहरातील बॅनर संस्कृतीला लगाम बसणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


